Bahujan News

आ. सुधीर मुनगंटीवार यांची रिक्षा चालकांसाठी मोठी घोषणा!

◾ नवीन ऑटोस्टॅण्ड व चालकांसाठी विशेष उपाययोजना
◾ नियोजन भवनातील बैठकीत घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

चंद्रपूर : जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक-मालकांच्या विविध समस्या आणि मागण्या लक्षात घेऊन, तसेच त्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवत, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नियोजन भवन येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत रिक्षा चालकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले. हे निर्णय शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासोबतच रिक्षा चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत सुधारणा घडवतील, असा विश्वास आमदार श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार मुनगंटीवार, संजीव रेड्डी बोदकूरवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, डॉ. मंगेश गुलवाडे, तसेच नम्रता आचार्य ठेमसकर, अजय सरकार, बंडू गोरकार, ऑटो मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष मधुकर राऊत, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर आणि संघटनेचे इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी निर्देश दिले की, “महानगरपालिकेचे अधिकारी आणि ऑटो चालक-मालक संघटनेचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून व्यापारी दृष्ट्या सोयीस्कर ठिकाणी ऑटोस्टॅण्ड विकसित करावेत. या स्टॅण्डची रचना करताना वाहतुकीची सुलभता, पार्किंग सुविधा आणि इतर सोयी लक्षात घेऊन उत्तम डिझाइन करावे.” तसेच बल्लारपूर, मुल, राजुरा, गडचांदूर, भद्रावती आणि गोंडपिपरी येथेही संभाव्य ठिकाणांची पाहणी करून ऑटो स्टॅण्डसाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी निधी रस्ते सुरक्षा योजना-2016 आणि डीपीडीसी अंतर्गत उपलब्ध करून दिला जाईल.

ई-रिक्षा केवळ पात्र आणि गरजू व्यक्तींनाच मिळाव्यात, यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने योग्य धोरण तयार करावे, तसेच ई-रिक्षा फक्त विशिष्ट मार्गांवरच चालवण्याचा प्रस्ताव असून याबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. याशिवाय सर्व वितरकांची यादी तयार करण्याचेही निर्देश दिले गेले. जिल्ह्यातील विद्यमान 31 रिक्षा स्टॅण्डची संख्या वाढवून बंगाली कॅम्प परिसरात दोन नवीन रिक्षा स्टॅण्ड विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले की, “ऑटो रिक्षा सेवा ही केवळ वाहतूक सुविधा नसून, ती शहराच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन ठोस आणि समन्वयात्मक निर्णय घेणे ही आपली जबाबदारी आहे. शासन आणि चालक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत व्हावा, यासाठी या निर्णयांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी,” अशा सूचना त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *